(पुणे )चित्रपटामध्ये आपण अनेकदा बघितलं आहे की लहान मुलं आणि तरूणींचा सौदा केला जातो आणि त्यांना भीक मागण्याच्या धंद्यात उतरवलं जातं, या सगळ्यामागे मोठ्या टोळ्या कार्यरत असल्याचंही सांगितलं जातं. अशी घटना प्रत्यक्षात घडली असून उत्तर प्रदेशातील एका तरुणाला  मारहाण करत भीक मागण्याच्या धंद्यात उतरवलं गेलं. अनूप सिंह असं या तरुणाचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील जौनपूरचा रहिवासी आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते योगेश मल्खरे यांनी या तरूणाची करूण कहाणी उजेडात आणली आहे. या तरुणाला ४ दिवसांसाठी १ हजार रूपये भाड्यावर घेतलं असल्याची माहिती त्याच्यासोबत भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने दिली आहे.

अनूप काही नोकरी मिळते का हे शोधण्यासाठी मुंबईत आला होता. मानव तस्करांनी हा तरूण नवखा असल्याचं हेरलं आणि त्याचं अपहरण करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा एक हात आणि पाय फ्रॅक्चर झाला होता. सिगारेटचे चटके देऊन आणि सतत मारहाण करून काही दिवसांनी मानव तस्करांनी त्याला धुनू काळे नावाच्या महिलेला भाड्याने दिलं. हे दोघे मिळून भीक मागत होते. काळेवाडी सिग्नलजवळ योगेश मल्खरेंची गाडी पोहचल्यानंतर हे दोघे तिथे भीक मागत असल्याचं दिसलं. योगेश यांना संशयास्पद वाटलं म्हणून त्यांनी गाडीतून उतरत चौकशी करायला सुरुवात केली. यापूर्वी अनूपच्या जागी एका लहान मुलाला घेऊन ही महिला भीक मागत असल्याचा दावा योगेश यांनी केला आहे. या महिलेला पकडून योगेश यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.  योगेश यांनी विश्वासात घेत अनूपची चौकशी केली, तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. सरकारने आणि पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली तर अनेक तरुण जे जबरदस्तीने भीक मागण्याची धंद्यात ओढले गेले आहेत, त्यांची माहिती मिळून शकेल असा दावा अनूपने केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *