पुणे, ८ जानेवारी, २०१८ : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, निर्माते व ‘प्रसाद स्टुडिओज्’चे प्रमुख रमेश प्रसाद आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे, तर प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले, तसेच ‘पिफ’मध्ये पुरस्कारार्थींना दिल्या जाणा-या खास मानचिन्हांचेही अनावरण पटेल यांनी या वेळी केले. ‘पिफ’चे प्रकल्प संचालक श्रीनिवासा संथानम आणि निवड समिती सदस्य अभिजीत रणदिवे या वेळी उपस्थित होते.

‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणा-या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे हे १६ वे वर्ष आहे. येत्या गुरूवारी- ११ जानेवारी रोजी  सायंकाळी ४.३० वाजता कोथरूड सिटी प्राईड चित्रपटगृहात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून त्या वेळी रमेश सिप्पी, रमेश प्रसाद आणि एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तर राजदत्त यांना १८ जानेवारी रोजी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी गौरवण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अॅलन ड्रल्जेविक दिग्दर्शित ‘मेन डोन्ड क्राय’ हा बोस्नियन भाषेतील चित्रपट दाखवून महोत्सवाला सुरूवात होणार आहे.

रमेश सिप्पी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘अंदाज’ (१९७१) हा त्यांचा पहिला चित्रपट असला तरी १९७२ मध्ये आलेल्या ‘सीता और गीता’ने त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली आणि १९७५ मध्ये आलेल्या ‘शोले’ या चित्रपटाने तर लोकप्रियतेच्या सर्व पाय-या पार केल्या. ‘शान’, ‘शक्ती’, ‘सागर’ अशा अनेक चित्रपटांबरोबरच सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेली ‘बुनियाद’ ही दूरचित्रवाणीवरील मालिकाही विशेष लोकप्रिय झाली.

प्रसिद्ध निर्माते आणि उद्योजक असलेले रमेश प्रसाद हे ‘प्रसाद स्टुडिओज’चे अध्यक्ष व प्रमुख आहेत. ज्येष्ठ निर्माते, अभिनेते व दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद यांचे ते पुत्र आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचे चित्रपट त्यातील कौटुंबिकता व नाट्यमयतेमुळे विशेष प्रसिद्ध झाले. साठच्या दशकापासून कार्यरत असलेल्या राजदत्त यांनी ‘घरची राणी’ (१९६८), ‘अपराध’ (१९६९), ‘भोळीभाबडी’ (१९७२), ‘देवकीनंदन गोपाला’ (१९७७), ‘अष्टविनायक’ (१९७८), ‘पुढचं पाऊल’ (१९८५) असे विविध विषयांवरील चित्रपट दिग्दर्शित केले. काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला आहे.

यावर्षीचा एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना प्रदान करण्यात येणार आहे. एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे तेलुगु, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेतील चित्रपटसंगीतात अतुलनीय योगदान आहे. विविध भाषांमधील सुमारे ४० हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली असून ते सहा वेळा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. गायक म्हणून असलेल्या ओळखीबरोबरच डबिंग आर्टिस्ट, संगीतकार आणि चरित्र अभिनेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *