नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक याआधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल लढविणार नाहीत. वर्षभरासाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही निवडणूक लढायची नाही, असा निर्णय पटेल यांनी घेतला.

प्रफुल्ल पटेल यांनी १९९१ ते ९८ तसेच २००९ ते २०१४ या काळात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्चनेनंतर त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती आणि विजयी झाले होते. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदीलाटेत पटेल यांचा पराभव झाला. भाजपच्या वतीने निवडणूक लढविलेल्या नाना पटोले यांनी पटेल यांचा पराभव केला होता. मोदीलाटेत विदर्भातील सर्व १० जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. भाजप नेतृत्वाशी बिनसल्याने नाना पटोले यांनी गेल्या महिन्यात लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षांचा कालावधी असल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार हे निश्चित. फेब्रुवारी वा मार्च महिन्यात भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. आयोगाकडून लवकरच कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *